सांगा स्वामी हे ( नामस्मरण) कसे काय जमणार?..
१.
श्री दिगंबर तुम्ही , सर्वज्ञ सर्वव्याप्त
माझ्या अंतकरणात विषय वासनांचा कचरा अनंत ..
आता तुम्हा तो दिसल्यावर, मग मी कुठे लपणार?
सांगा स्वामी हे कसं काय जमणार?
२.
श्री वैराग्यांबर तुम्ही ,तुम्हा लागे सर्व कर्मांचे समर्पण
मी रोज कणाकणानी वाढवतो माझे ‘मी ‘ पण..
आता असे कर्म तुम्हाला कसे काय अर्पिणार?
सांगा स्वामी हे कसं काय जमणार?
३.
श्री ज्ञानांबर तुम्ही , ज्ञान तुमच्या दर्शनाने उपजते
इथे एक certificate मिळाले तरी दहा ठिकाणी माझी पोस्ट जाते !
हे पाहिल्यावर तुम्ही कसे आपले म्हणणार ?
सांगा स्वामी हे कसं काय जमणार?
४.
श्री स्वानंदाबर तुम्ही, देणारे आनंद अलौकिक
मी वस्तु वस्तुत शोधत फिरतो सुख ते क्षणिक
जो कधी अनुभवलाच नाही तो स्वानंद कसा मी ओळखणार?
सांगा स्वामी हे कसं काय जमणार?
५.
श्री अतिदिव्यतेजांबर तुम्ही, तुमचे तेज प्रखर
साध्या व्यवहारीक सत्याचाही मला साहवे ना निखार
तुमचे रुप मी डोळ्यासमोर कसे काय आणणार?
सांगा स्वामी हे कसं काय जमणार?
६.
श्री काव्यशक्तिप्रदायक तुम्ही प्रेरीले संतांना साहित्य
कसेबसे यमक जुळवण्याची धडपड माझी नित्य
वाचन नाही, विचार नाही - मी काव्य कसले लिहिणार?
सांगा स्वामी हे कसं काय जमणार?
७.
श्री अमृतमंत्रदायक तुम्ही पेरतां मोक्षाबीज सनातन
पण माझ्या मना तर आवडे सतत प्रलोभनांचे चिंतन
या असल्या जमिनीत नामाचे अंकुरण कसे होणार?
सांगा स्वामी हे कसं काय जमणार?
८.
श्री दिव्यज्ञानदायक तुम्ही जे अतिगहन ,अगम्य
तुमच्या कृपे शिवाय ते कोणाही उमगणे अशक्य
पण उपासनेचे साधे नियमही मी नाही पाळु शकणार
सांगा स्वामी हे कसं काय जमणार?
9.
श्री दिव्यचक्षुदायी तुम्ही , शिष्य पावती सिद्धीसम शक्ती
फक्त लागते नामस्मरण सतत आणि तुमची अतुट भक्ती
ईथे मी दिवसातून जेमतेम दोनदा हात जोडणार ..
सांगा स्वामी हे कसं काय जमणार?
१०.
श्री चित्ताकर्षणाय तुम्ही , नामाची लावता गोडी
म्हणती सुरवात करा निर्धारे मग आपोआप चालते गाडी..
हे माहिती असुनही आमची गाडी रोज भलती कडेच भरकटणार..
सांगा स्वामी हे कसं काय जमणार?
११.
श्री चित्तप्रशंताय तुम्ही , अपूर्व मनःशांती दाते
चंचल असो वा अशांत , मन नामाने स्थीरच होते
पण हा अनुभव येण्या मला अजुन किती काळ लागणार?
सांगा स्वामी हे कसं काय जमणार?
……सांगा स्वामी हे कसं काय जमणार?🙏