हे तेज रुपी गुरूवरा
शरीर माझे सेवेस तुमच्या तुम्हीच हो तयार करा..
सर्वज्ञ तुम्ही , मस्तक माझे शुद्ध करा
विखरलेले विचार माझे तुमच्याच नामी एकाग्र करा
स्वयंप्रकाशी तुम्ही, नेत्र माझे शुद्ध करा
बंद डोळ्यांपुढे चरण तुमचेच स्पष्टपणे प्रकट करा
हे तेज रुपी गुरूवरा
शरीर माझे सेवेस तुमच्या तुम्हीच हो तयार करा..
वाचासिद्ध तुम्ही, कंठ माझा शुद्ध करा
वैखरीतुन नामाचाच अखंड उच्चार सुरू करा..
अलंकित तुम्ही, हृदय माझे शुद्ध करा
बैसण्याची तुमची जागा तुम्हीच हो स्वच्छ करा..
हे तेज रुपी गुरूवरा
शरीर माझे सेवेस तुमच्या तुम्हीच हो तयार करा..
स्मर्तृगामी तुम्ही, चरण माझे शुद्ध करा
पाऊले माझी योग्य मार्गीच आपोआप वळवत चला..
सर्वव्यापी तुम्ही, अस्तित्व माझे शुद्ध करा
विलीन होण्या तुमच्यात तुम्हीच त्याला पात्र करा
हे तेज रुपी गुरूवरा
शरीर माझे सेवेस तुमच्या तुम्हीच हो तयार करा..