कुणी जातो गाणगापूरी
कुणा जमे अक्कलकोटाची वारी
घडो तुझी पूजा माझ्याही अंतरी , स्वामी समर्था🙏
माझा देह तुझे क्षेत्र
मिटून बसलो मी नेत्र
दिसू देत चरण पवित्र , स्वामी समर्था
घालू तुझ्या पादुकांना स्नान
लागो माझे तिथे ध्यान
सुटो भवतालाचे भान, स्वामी समर्था
तुझ्या चरणी करु वंदन
वाहू हळद, कुंकू आणि चंदन
घेऊ मुखी तुझे नाम, स्वामी समर्था
दिसे तुझी मूर्ती ती गोजरी
वाहू फूले गुलाब , मोगरी
मन डुंबे आनंदसागरी , स्वामी समर्था
जसा उदबत्ती चा धूर
तसा मनी विचारांचा पूर
कर तूच त्याला स्थिर , स्वामी समर्था
जश्या निरंजनाच्या ज्योती
शांत तरीही तेवती
तशी असो माझी भक्ती , स्वामी समर्था
जसा जळे पटकन कापुर
तसा जावो माझा अविचार
तूच मला दे आधार , स्वामी समर्था
जसा गन्ध तो धुपाचा
तसा छंद तू मनाचा
वेगळा ना कधी व्हावा , स्वामी समर्था
तुला पंचपक्वानांचा नैवैद्य
तू स्वामी माझा आद्य
तुझ्या पूजेत मज आनंद , स्वामी समर्था
ना टाळ ना मृदुन्ग,
अर्पितो तुझ्या चरणी हा अभंग
सदा घडो तुझा संग, स्वामी समर्था