श्री गणेशाय नम: . श्री स्वामी समर्थ नम :
In this page I am sharing poems summarizing stories in Swami Samarth Bakhar by Gopalbuva. I am neither trained in poetry writing nor do I claim any accurancy in my poems in depicting the original stories. This is just my attempt to do Swami seva as inspired by him 🙏
note - this is currently a work in progress.om4
1.
अक्कलकोट स्थान गाणगापुरा संनिध
प्रगटले दत्तावतारी स्वामी होण्या प्रसिद्ध ||
दृष्टांत पावले पुजारी आणि अनेक भक्त
अक्कलकोटास जावे, तिथेच वसे अवतारी दत्त ||
महासिद्ध गोपाळबुवा जसे वर्तवले भविष्य
टोळांस मिळे स्वामी सहवास, उजळले त्यांचे भाग्य ||
2.
गाणगापुरी मुंज मुलाची, असा विप्र-नवस
अक्कलकोटी द्रव्य संपता, प्रार्थी स्वामी चरणास ||
नवस तो फेडून घेती, तिथेच पूर्णकामी
गाणगापुरी जो दत्त, तोच अक्कलकोटचा स्वामी ||
3.
ठाकूरदासबुवा होते अनन्य दत्तभक्त
दैवयोगे झाले त्यांचे सर्वांग श्वेतकुष्ठ व्याप्त ||
गाणगापुरी दृष्टांत होता, आले अक्कलकोट धामी
नवसाची कस्तुरी मागून घेती कौतुके स्वामी ||
काष्ठ जळके देऊनी, स्वामी कुष्ठ निवारती
पुढे गुरुनाथ नावाचा उत्तम पुत्र ही दिधती ||
गुरुपदेश-इच्छा स्वामी अंतर्साक्षी ओळखती
अंतापर्यंत ठाकूरदासबुवा, राहिले स्वामी सेवेसी ||
4.
कुष्ठव्याधी एकाच्या शरीरी, सेवा करी तो गाणगापुरी
दृष्टांते आला अक्कलकोटी, तिथे स्वामीं कृपा करी ||
“विष्ठा लाव” म्हणता, स्वामींच्याच विष्ठेचा केला लेप
चार दिवसांतच व्याधी गेली, कांती झाली हो निर्लेप! ||
5.
पैसे बुडवले एका बुवाने, समाराधनेच्या बहाणे
स्वामी ऐकती, तव 'वाईकर' ब्राह्मणाचे गाऱ्हाणे ||
तोच बुवा दाखवून गर्दीत , मिटवती तक्रार वाईकराची
बोळवण करून मग त्यासी, पाठविले हो स्वगृहाशी ||
6.
श्रीधर पोटशूळे आजारी, सेवा करी तो गाणगापुरी
दत्तगुरु देती स्वप्नी औषध, ज्यात असे हो 'पान श्रीपुरी' ||
अर्थ न उमजता तयाला, जा सांगितले स्वामींकडे
“अरे श्रीपुरी म्हणजे कडुनिंब!” स्वामी सोडवती त्याचे कोडे! ||
7.
गोविंदराव दत्तोपासक स्वामीभक्त, दृष्टांती पाही स्वामीं गाणगापुरात
विराजमान ते नृसिंहसरस्वती देवालयात, निजपादुका शोभती पायात ||
अनेक सिद्ध, साधू, तापसी आणि जे वेदांतनिष्ठ
सर्वही मानिती हे अक्कलकोट स्वामी, दत्तावतार हो निश्चित! ||
8.
स्वामी मूळ कुळ वर्णाचा, न लागे कोणास पार
सतेज गौर-तांबूस दिव्यकांती, अजानबाहू अन तेज प्रखर ||
रागवता स्वामी राजादिकही कापती, पळती मनी धरूनी भीती
परि शरणागत भक्तांवरी, स्वामींची असे सदा अमृतदृष्टी ||
9.
लाकूडतोड्या जागृत करी, समाधीस्थ स्वामी
तीर्थे हिंडूनी पावन करिती, स्थापिती पादुका देवलग्रामी ||
मोगलाईत मठ स्थापिला, चंचलभारती हे नाम धारण
मंगळवेढी प्रकट जाहले, अक्कलकोटी केले मग आगमन ||
वय न जाणे स्वामींचे कवण, पुराणपुरुष हे निश्चित
दीनदयाळू भक्तांचे कैवारी, चरणी त्यांचे आमचा प्रणिपात ||
10.
राजूरच्या चंदुलालावर स्वामींची प्रिती
कौतुके हुशार सेवका "चंदुलाल" म्हणती ||
नानारेखींनी मांडली स्वामी-जन्मपत्रिका
प्रकटले चैत्र शुद्ध द्वितीये, उत्तर देशिका ||
स्वामीसुतही हेच मानती, प्रकटकथा ही साचार,
अगम्य तरीही गोड वाटते, स्वामीलीला ती अपार. ||
11.
कलकत्त्याचा गोरा बॅरिष्टर , स्वामींना प्रश्न करी
कर्दळीवनाहुन प्रवास आपला , स्वामीं तयासी विस्तारी ||
गाणगापुरच्या पुजाऱ्या सांगती, "मीच नृसिंहभान",
गुरुचरित्राशी नाते उमजे, दत्तावतार स्वामी महान ||
12.
मालोजीराजे वेदान्त श्रवणा पाचारती, प्रसिद्ध वक्ते विष्णुबुवा ब्रह्मचारी
स्वामींसमोरी ते गर्वोक्ती करी, ब्रह्मतदाकारतेचा प्रश्न विचारी ||
स्वामींनी त्यांना धडा शिकविला, स्वप्न-विंचू-दंशाचा अनुभव दाखविला
खरे योगी अन् पढतमूर्ख, हा भेद तयांसी समजावला||
मंगळवेढी बाळकृष्णबुवा सिद्ध चमत्कारी, स्वामी चरणी नमन करी
दिव्य अवतारी स्वामी समर्थ, खऱ्या भक्तां दिसे योग्यता अपारी ||
13.
मंगळवेढी गरीब ब्राम्हणा, स्वामी मागती दशमी भोजना
भाकड गाय दुभती केली, न मागता त्यावर कृपा वर्षली ||
स्वामी वाक्य हे कामधेनू , चराचर आज्ञेत ज्या जगद्गुरू
भक्तां घरी स्वये येती , त्यांची सर्व काळजी वहाती||
14.
स्वामी निजले कंटक-शय्येवरी, पाहुनी उपजे भक्ती बसाप्पा अंतरी।
बहु वर्षे तो स्वामीसेवा करी, मग स्वामी जाहले प्रसन्न त्यावरी।।
स्वामीकृपे बने सोन्याची लगड, सर्प जो धरिला वनी निविड।
क्षणात दारिद्र्य निवारण करी, स्वामीभक्तीचे फळ हे अजोड।।
15.
बावन्न वर्षांची शूद्र स्त्री ती, बसाप्पा सांगे तिसी
"कर स्वामी-सेवा संतानप्राप्तीसी", मनी धरुनी भक्तीसी ||
नित्य करी ती स्वामी-दर्शन, मगच करी ती भोजन
स्वामी झाले भक्तीवर प्रसन्न, वदले "खा चिक-साखर" ||
स्वामी-भक्ती जो करी, त्याचे जीवन बने सुगम।
संतान दिधले तिज उत्तम, स्वामी-वचन हा चमत्कार।।
16.
बाबाजी भटाच्या घरात, पाणी नव्हते आडात
स्वामींनी मागितले पाणी, तेंव्हा बाहेरून आणण्या ते निघत ||
“घरातच आहे पाणी “ स्वामी आशीर्वाद देत वदले
लघुशंका केली आडात, तेथे पाणी तुडुंब भरले ||
17.
मंगळवेढी तंतुकार एक, दारिद्र्य दुःखे होता पीडित
स्वामी भक्तांचे रक्षक, सकल त्यांचे कष्ट हरित ||
तुळशी वृंदावन घरातले , पित्याचे द्रव्य होते पुरले
स्वामी कृपा होता तंतुकारा, सव्य चरण त्याने धरिले ||
18.
बाह्यात्कारी पिशाच्चवृत्ती, परी अंतरी ब्रह्मतदाकार
मंगळवेढीचा यवन तारिला, स्वामी ज्ञानी कृपासागर ||
देव मामलेदार सेवा करती, राहुनी पहा स्वामीसह
योग्यता पाहुनी स्वामी करिती, भक्तांवरती अनुग्रह ||
19.
स्वामी मठात निजले, लावुनी कडी रामदासी गेले
लोंका दिसले स्वामी नदीतीरी, रामदासी झाले चकीत भारी ||
चळांब्यास विनोद घडला, परब्रम्ह बंदीस्त होईल का कधीतरी ?
भक्ती हा एकच उपाय स्वामी राहण्या तुमच्या घरी! ||
20.
स्वामी विराजती नदीतीरी , मंगळवेढी डोंगरपायरी
दिव्य पुरुष दोन भेटी येती ,तीथे पहा स्वामी जवळी ||
त्यांचे झाले जे संभाषण, न मुळी उमगे उपस्थित गण
सामान्य जना असे पुरे , फक्त स्वामींचे नाम स्मरण ||
21
हुमणाबादेस माणिकप्रभु-सन्निध, स्वामी दर्शन लाभे सबनीसांना |
“दर्शन घे, हेच तुझे गुरू", माणिकप्रभु सांगती तयांना || १ ||
स्वामी स्वतः कृपा करिती, अक्कलकोटी जाण्या सुचविती |
येता स्वामी अक्कलकोटी, सबनीस लागले चरणापाशी || २ ||
पुढे आणखी विनोद घडला, पंढरीनाथाचा जोडा स्वामींनी नेला |
शंका येता परत दिला, अन मंगळवेढा कायमचा सोडला || ३ ||
22
मोहळास पुराचा ओसरला जोर, नदीपार जाता लागले स्वामीचरण
गवेस्वामींस दिधले दर्शन, सुटले तयांचे दुर्गम योगाचरण
हट्टी कोष्टयाचा हट्ट ब्रह्मदर्शनाचा, भ्रमिष्ट झाला रागवता स्वामी
गवेस्वामींनी करुणा भाकता, कोष्ट्यास पुर्ववत करिती स्वामी
23
विटाळ होतो” म्हणुनी सोहनींच्या, घरातूनि निघती स्वामी |
वासना-विषय सोडण्या सांगती, परी न ऐकती सोहनी ||
संकट आले नोकरीवरी, आज्ञा मोडता दु:ख पावले |
शरण येता कृपेने तरले, स्वामींचे ऐकता ऐश्वर्य पावले ||
24.
सोलापूरी दत्तमंदिरी स्वामी दर्शन जाहले चिंतापंत टोळांस
सर्वज्ञ स्वामी जाणूनी, स्वगृही नेले अतीप्रेमे भोजनास
पुढे एकदा स्वामी आचरणी, शंका आली टोळांच्या मनी ।
स्वामी जाती तडक निघोनी, मग पश्चात्तापे लागती चरणी ॥
स्वामी भोजनी थांबती टोळांचे पुत्र, जरी उशीर झाला जाण्या कचेरीत
स्वामी सहज दाखविती चमत्कार , स्वाक्षरी उमटवती त्यांची
हजेरीपटात
25.
टोळ बनले अक्कलकोटचे कारभारी, संगे येण्या स्वामींना विनंती करी
“उन्हाळा आहे , पाऊस पडल्यावर येऊ” उत्तराती साक्षात्कारी
कार्तिकमासी दिपावळी नंतर मालोजीराजे बसती गादीवर
मग अक्कलकोटचे भाग्य उघडले, स्वामी तेथे राहण्या आले
31.
स्वामी काटक्यांच्या राशी करी, लक्ष्मी तोफेत डोके घाली
चितोपंत टोळांघरी स्वामी अगम्य लीला करी ||
पुढे होता बंड आणि हत्या मग लोक उमगती सत्या
प्रत्येक स्वामीकृतीत असे गर्भीत अर्थ , परी सामान्य जन तो समजण्या असमर्थ ||
32.
महाराजांच्या आगमने, भाग्य अक्कलकोटचे बदलले
गाड्या घोडे, बाजर धंदे शतपटीने ते वाढले||
आर्त, जिज्ञासू , अर्थार्थी आणि ज्ञानी सर्व स्वामी दर्शना आले
ज्याच्या त्याच्या योग्यते प्रमाणे स्वामी कृपा प्राप्त झाले ||
भक्तागणिक अनेक चमत्कार स्वामींनी केले ,
योग्य भक्ता कधीच न विमुख पाठवले ||
स्वामी सहवास, स्वामी आरती , स्वामी सेवेत सुख पावले
भाग्यवान ते प्रेमळ भक्त जणू नंदनवनाचे सुख पावले||
33.
पाहून समर्थांचा तो राग, करी टीका एक अभाविक
त्यासी न उमगे तो कोप, असे केवळ क्षणिक ||
राव असो वा रंक, स्वामी सर्व भक्तांचे रक्षक
जरी कोपले ते साच, तर कोण असे ताराया समर्थ? ||
34.
राजा हत्तीवरून दर्शनास आला, स्वामींच्या प्रकोपे श्रीमुखात पावला
राजा वा रंक स्वामींना सर्व समान, जगत्पालकापुढे व्यर्थ मानवाचा अभिमान ||
35
गणपतराव जोशींचा गडी, कडुनिंबांची फांदी तोडी
“कोण तोडतो माझ्या पालखीची दांडी?” संतप्त स्वामी सवाल करी
उकिरड्यावर बसती स्वामी निवांत , गांधीलमाशी कान पोखरी वाहे रक्त
स्वामी लीला विचित्र अन अर्थपूर्ण, अचंबित होती सदैव भक्त
36.
मालोजीराजांस दोन कन्यारत्ने, मग पुत्रप्राप्ती झाली
सर्वज्ञ स्वामी कृपेने लोकां, प्रचिती भविष्याची आली||
सर्वशक्तिमान, सर्वश्रेष्ठ ते, त्यांना काय अशक्य
त्यांच्याच हाती भक्तांचे वर्तमान, भुत आणि भविष्य ||
37.
दोन डोक्याचा माणूस" म्हणती ज्या भीमरावास
कंटाळूनि व्याधीस येई शरण स्वामी चरणास ||
स्वप्नी दर्शन देऊनी निवारले त्या रोगास
तीर्थ-अंगारा लावता, लाभे आरोग्य भीमरावास ||
38.
बर्वे कारभारी चोळाप्पा पुत्राची थट्टा करी
परी स्वामी महाराज रागवता क्षमा याचना करी||
स्वामी न आधीन कोणापरी , जरी चोळाप्पा स्वामी सेवा करी
अंतकाळीही दर्शनास मुकला , द्रव्यलोभे स्वामीकृपेस दुरावला||
83
माटे विद्वान दुराभिमानी,त्यांनी दुषिले किर्तनी स्वामींसी
संन्यासी-बोधें उमजली महती, पावले तेची पश्चात्तापासी ||
शरणागतावर ठेवती दयाळू स्वामी नेहमी दृष्टी कृपेची
भागवत सप्ताही देती माटेंना सेवा दुर्लभ स्वचरणांची ||
84
आमटी, कडबोळी, भजी अन् क्षिप्रा
स्वामी कौतुके सांगती नैवेद्य एका विप्रा ||
न जेविताही वर्णिती प्रत्येक त्या चवीला
“जाणून करावे कर्म” असा बोध त्यांनी दिला ||
85
नवस बोलला एक जो भाविक व्यापारी
अर्पिली त्याने डाळिंबे, परी सुंदराबाईं अपहारी ||
अस्वस्थ भक्तांना स्वामी म्हणती "रहा स्थिरी"
सुंदराबाईंना मात्र स्वामींनी केले सेवेतून दूरी ||
86
पोटदुखीने बेजार बाई आली स्वामीं चरणी
"विधवा होता होशील बरी" वदली स्वामी वाणी||
वदले जसे स्वामी तसेच घडे तिचे प्रारब्ध
स्वामी लीला असती अगम्य आणि अगाध||
87
पंचभूतात्मक हा देह, वस्तू त्यातली 'आत्मा' निर्गुण
वेदान्त सांगे सामान्य महिला, वटवृक्षाला पुसून जाण ||
संतसंगती होई सुलभ, वस्तुसाक्षात्कार जरी दुर्बोध
स्वामींचे बोलणे अतिगहन, साध्या प्रश्नातून लाभे बोध ||
88
साठ वर्षांच्या माटेबाई, संतान विना त्या अति व्यथित
शरण येता स्वामी चरणी, श्रीफळ प्रसादे पुत्र प्राप्त ||
माटेबाई थोर पुण्यवंत, आणि पूर्ण त्या स्वामीभक्त
लीला ऐकता स्वामींची, अश्रू येती नयनीं सतत ||
89
केसीगावचा अप्पा पाटील, घाली भक्तांना जेवण,
गर्विष्ठ तो तालुकदार, देई त्यास खोटे दूषण ||
भक्तावरी संकट येता, स्वामी समर्थ ते निवारती,
त्या तालुकदारा आठवड्यात, दुष्कर्माची शिक्षा देती ||
90
दाजिबा भोसले आणि साथीदार, झाले अती उन्मत्त
राजेसाहेबांच्या मर्जीतले, छळली प्रजा अत्यंत||
सज्जन-बोध झिडकारला, स्वामी आज्ञेचाही अव्हेर केला
कोपता स्वामी सर्वस्व बुडाले, संस्थान बघा खालसा झाले||
91
चिमाबाई रास्ते लहान मुलगी , दृष्टी हरपली येता सारा
उपाय सारे हरता शेवटी स्वामी चरणी घेतला आसरा||
साखर विहीरीजवळ होते स्वामी त्यांनी तत्काळ केली कृपा
मांजराचे दूध सात दिवस लावता दृष्टी जाहली निकोपा||
92.
स्वामी सेवेसाठी आला नरसाप्पा कानडी
भाषा न ये परी राहे स्वामी संनिध्ध आवडी||
“गीता वाच” स्वामी वचन कानडीत दिसे जरी लिपी होती मोडी
वैकुंठ दर्शन घडवून आणती स्वामी, नरसाप्पाचे भाग्य थोर!||
93.
वामनबुबा कंटाळले कारण बळकावल्या अनेक व्याधी
जीव देण्या निघाले परी स्वामी परावृत्त करिती||
हस्तस्पर्श होता स्वामींचा दूर झाले सर्व रोग
अक्कलकोटी येता संपला उरला सुरला भोग||
दुष्काळातही स्वामीकृपे सर्व गावकरी पुरणपोळीचे जेवती
प्राणायामी वामनबुवांना स्वामी गुरुसेवेचा खरा मार्ग दर्शविती||
94.
वामनबुवा येता स्वामीं दर्शना ,हाकलून देती करून नृसिंह गर्जना
परत बोलावुन शंका निवारती स्वामी भक्तापारखुन मग कृपा करती.||
“समुद्र भरला हवे ते घ्यावे, शेत पिकवुन खावे”
स्वामी उक्ती परमसत्य, भक्ती करुन अमाप लाभावे ||
95.
मुखातील तांबुल देऊन वाचा, दिली मुक्या विप्रास
"बोडकी झाल्यास पोळ्या भाजशील", वदले एका स्त्रीयेस ||
ज्याची जशी कर्मे तशी, कृपा करिती स्वामी
विधिलिखित बदलणे सहज शक्य, प्रत्यक्ष त्रिमुर्ती स्वामी ||
96.
सावंतवाडीचे भोसलें, पत्नीच्या पायास जडली व्याधी
वाटदरीच्या डोंगरावर होता भेटी, स्वामीचरणी माथा ठेवती ||
गाद्यागिरद्या वैभव स्वामी नाकारती, पण रोग निवारणा त्वरित औषध देती
स्वामी तेजे भोसले चकीत होती, नेहमी स्वामी दर्शना येती ||
97.
स्वामी जेवेनात एकदा म्हणून भोसलेंही उपाशी राहिले
मग पाच वाजता संध्याकाळी कनाती लावून भोजन केले||
“मला काय भेट आणलीस?” स्वामी भोसलेंच्या कुटुंबास म्हणाले
मग पसाभर हरबरे ओटीत घालून दोघांनीही घरी पाठवले ||
98.
मैंदरगीचा पांडू सोनार कर्जात बुडाला
स्वामी भक्त असूनही दागिन्यांना सोन्याचा मुलांमा दिला.||
फटाक्यांची शिक्षा होता पश्चातापी स्वामी धावा केला
मामलेदाराकडे प्रत्यक्ष जाऊन स्वामींनी त्याला वाचवला||
99.
मैंदरगीचा जमादार, त्याने कैदी पळतां स्वामींचा धावा केला
स्वामीकृपे कैदी खंदकी मिळाला, जमादार नोकरी सोडून स्वामी पायी आला ||
स्वामींनी जोडा टाकला, तो नेऊन त्याने गावी पूजिला
स्वामी कृपे प्रसिद्ध झाला , आमरण स्वामी सेवेत राहिला||
100.
रावजी पाटील-विठाबाई , स्वामी भोजनाचा नवस करी
दर्शनासी भक्त जमले अपार, रावजी चित्ती चिंता भारी ||
स्वामी कृपेने नवल जाहले, 'अन्नपूर्णा' पूजन करविले
चाळीस जणांची होती तयारी, जेवले तेथे चार हजारी ||
101.
भगवंतआप्पा सुतार इच्छिती, स्वामी उच्छिष्ट प्रसाद
मळ्यावरी तो नेई स्वामींना, भक्ती मनी ती अपार ||
चार पानांची अल्प सामग्री, पन्नास जन हो जेवले
चुळांच्या जळाने अग्निहोत्र, स्वामींनी प्रज्वलित केले ||
ब्रह्मस्वरूप स्वामी समर्थ, काय अशक्य तयांना
अक्कलकोटीचा पूर्णब्रह्म हा, तारी सकल भक्तांना||
102.
बसलगावी गेली भक्तांसह स्वामींची स्वारी,
मळ्यात बसुनी, ग्रामदेवीला निरोपण्याची आज्ञा करी ||
शिंपी अर्पे नैवेद्य, पन्नासांच्या तयारीत पाचशे जेवले तृप्त,
भक्तवरद स्वामींनी समंध घालवूनी, केले तया मुक्त ||
103.
समर्थ भजनी आनंदी जयाजीराव शिंदे आणि गोविंदास्वामी
त्याकरता राजवाड्या बाहेर येऊन दर्शन देती स्वामी ||
स्वामी प्रश्नावर परमहंसाची लक्षणे सांगती गोविंदबुवा
स्वामी हसुन आणि थोडे रागावून बोलवणं करती तेधवा ||
दादुमिया मुसलमान त्यासी,
स्वामी मागती भाकरी आणि बेसन ||
प्रसाद पाहुन गोविंदबुवा लज्जित झाले ,
परमहंसांचे वागणे प्रत्यक्ष कृतीने स्वामींनी शिकवले ||
104.
सोलापूरचे बापुराव स्वामी भक्त, अक्कलकोटची करती वारी
स्वदु:खे पिडीत दोन माणसे होती प्रवासात बरोबरी ||
एका लग्न तर एका नोकरीची इच्छा , मनात असे परोपरी
म्हणे कार्य साधले तरच म्हणू , अक्कलकोटचे स्वामी अवतारी ||
अंतर्यामी स्वामी सर्व जाणती , शंका घेतली म्हणून रागे भरती
शरण येताची प्रसन्न होती कृपाघन, इप्सित कार्य त्यांचे पुर्ण करिती ||
105.
सप्तशृंगी मातेच्या मुखीचा तांबुल वामनबुवांना दिधला
पंढरपूरी पांडुरंगे गंगाजळीचा स्वीकार केला ||
अक्कलकोटी अंतर्रयामी स्वामींनी यात्रा वृत्तांत कथिला
सर्वत्र एकच स्वामी' असा प्रचितीचा भाव दाविला ||
106.
स्वामी चरणी असती नाना प्रकारचे लोक
काोणी सात्विक तर कोणी उद्दाम हिंसक ||
कानफाट्या लोकांची डोकी फोडी, पोलिसांनाही ना आवरी
तोच स्वामी पलंग वाहे शिरी , स्वामी विष्ठा ही भक्षण करी ||
107.
चैत्र वद्य अकरा प्रात:काळी, वामनबुवा इच्छिती स्वामीस्नान गंगाजळी
स्वामी आज्ञेने पूजा करिती, रेशमी वस्त्रे अर्पण ती करिती ||
कीर्तन मांडले सायंकाळी, परी स्वामी नैवेद्य मागती त्याच वेळी
भक्तांवरी स्वामी सदा प्रसन्न, सेवा घेती स्वतःच करवून ||
108.
एक दरिद्री ब्राह्मण बाई, स्वामींना नैवेद्य घेऊन येई
मनात चिंती जवळी न येई, दाद न तिला कोणी देई ||
“भटणीचा नैवेद्य कोण अडवतो?” अचानक स्वामी गर्जना होई
अंतर्साक्षी तो दयानिधी , नैवेद्य स्विकारुन पुत्र तीजला देई ||
111
पोटशूळाने त्रस्त विप्र, नरसोबाच्या वाडीस बोले नवस
दत्तकृपेने होई व्याधी मुक्त, परी नवसाचा पडे विसर त्यास ||
अक्कलकोटी येता समोर, स्वामी तयासी रागे भरी
फेडून घेई पेढ्यांचा नवस, सर्वज्ञ स्वामी दत्तावतारी ||
112.
वामनबुवां तीर्थयात्रे गेले, स्वामींसाठी विविध सामान जमविले
पदक देण्या जरी विसरले , सर्वातंर्यामी स्वामीनी मागून घेतले!
“कुत्र्यांना तुकडे घाल!” स्वामी वदले
दसर्यावरी अक्कलकोटी रहाणे सुचीत केले
स्वामी आज्ञेशिवाय गाणगापूरी जेव्हां केले प्रयाण
चिखलात रुतले मार्गी , शेवटी स्वामींनीच वाचवले प्राण!
113.
सर्वत्र , सर्वज्ञ , सर्वश्रेष्ठ स्वामी,
लीला दाविती अनेक हरेक दिनी||
पांडुरंग केशवा देती साताऱ्यात दर्शन ,
लख्याने खाल्ला गुळ म्हणून करती रोदन ||
114.
“वाळकेश्वरा होते पंचवीस वर्षे” स्वामी सांगती दामोदरजीते
अंतर्साक्षी स्वामी तरी अनेक प्रश्न विचारती बहुजन साचे ||
जसा समोरचा तसे उत्तर असे स्वामींचे
परी मुक्तीची ओढ भासे एखाद्याच विरळागताते||